शताब्दी महोत्सव;'इये मराठीचिये नगरी' या रंगमंचीय आविष्कारास श्रोत्यांची दाद...
शताब्दी महोत्सव;'इये मराठीचिये नगरी' या रंगमंचीय आविष्कारास श्रोत्यांची दाद...
कराड दि.19-संगीत, नृत्य, नाट्य आणि चित्रकलेचे रंग उधळणारा 'इये मराठीचीये नगरी' या रंगमंचीय आविष्कारात एस.एम.इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतीने शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात दाद मिळवली.
सुमारे 80 हून अधिक विद्यार्थ्यांनी मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती, चालीरीती, परंपरेचे दर्शन घडविले. संकल्पना, संहिता आणि दिग्दर्शन अभिजित कुलकर्णी, नृत्य दिग्दर्शन अदिती जोशी, भारती सुतार तर गायनाचे मार्गदर्शन शाळेतील संगीत शिक्षिका योगिता जोशी यांचे होते.
महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा, येथील पद्धती, परंपरा आणि त्याचे समकालीन संदर्भ यांचा धागा जोडून तयार झालेला रंगमंचीय आविष्कार लघुनाट्य, एकपात्री, द्विपात्री प्रयोग, काव्यवाचन आणि निवेदनातून अधिकाधिक खुलत गेला. कुसुमाग्रज, शांता शेळके, संजीवनी बोकील, बा.भ. बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
सलाम, नगं तोडू माजी शाळा यासारख्या कविता रसिकांची दाद मिळवून गेल्या. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला दिलेली आदरांजली, आचार्य प्र के अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन, वाऱ्यावरची वरात, एकच प्याला, संशयकल्लोळ यासारख्या नाटकांमधील प्रवेशांना रसिक प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद लाभला. ओम जोशी, चिन्मय कुलकर्णी, सार्थक पाटील, जाई पाटील, ऋतुराज मसूरकर, आर्या कोरडे, यांच्यासह नारायणी गरुड, सफिया मुलाणी यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमाने वेगळीच उंची गाठली. शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, अध्यक्ष डॉ अनिल हुद्देदार, यांच्यासह मुख्याध्यापक संतोषकुमार गिरी, यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम उत्तम झाला अशी प्रतिक्रिया उपस्थित रसिक श्रोत्यांनी यावेळी दिली .चित्रकार आबासाहेब पाटील, समृद्धी पवार, प्राची पाटील यांनी मोजक्या वेळेत कॅनव्हास पेंटिंग केले, तर सुमारे 15 विद्यार्थ्यांनी स्केचेस मधून मान्यवरांच्या प्रतिमा रेखाटल्या.
Comments
Post a Comment