येवती येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन; आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप...
येवती : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा. बाजूस डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, प्रमोद जठार, सुनील पाटील, पैलवान धनंजय पाटील व अन्य मान्यवर.
मोदींनी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणले : ना. अजयकुमार मिश्रा...
येवती येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन; आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप...
कराड दि.17 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय्य ठेऊन जनतेसाठी जलजीवन मिशन, हर घर नल, आयुष्यमान भारत योजना, खाद्यान्न योजना, मोफत लसीकरण अशा अनेक योजना सुरू केल्या. या लोकोपयोगी योजनांमुळे गेल्या ८ वर्षात मोदींनी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणलेले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी केले. जलजीवन मिशन अंतर्गत येवती (ता. कराड) येथे सुरु करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते.
लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या ना. मिश्रा यांचे कराड दक्षिण मतदारसंघात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येवती येथे झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, माजी आमदार प्रमोद जठार, कराड तालुका बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जि.प. सदस्य सागर शिवदास, सौ. श्यामबाला घोडके, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, सरपंच सागर शेवाळे, उपसरपंच मनिषा पुजारी, संजय शेवाळे, मुकुंद चरेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. मिश्रा म्हणाले, मोदींच्या नेतृत्वामुळे आज संपूर्ण जग भारताचा सन्मान करतेय. युक्रेनसारख्या युद्धात मोदींनी दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींशी बोलून, भारतीय विद्यार्थ्यांना सहीसलामत त्या देशांतून सोडवून आणले. जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटविले. नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगाचे नेतृत्व करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. पण मोदींना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना दूषणे देणारे लोकही या देशात आहेत. ज्या लोकांच्या बौद्धिक विकासाबद्दल प्रश्नचिन्ह आहे, असे राहूल गांधींसारखे लोक मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची होत असलेली प्रगती पाहवत नसल्यानेच सतत काही ना काही बरळताना दिसतात, अशी टीका त्यांनी केली. देशाच्या प्रगतीला रोखण्याची हिंमत दाखविणाऱ्या अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र यावे आणि भाजपच्या बाजूने उभे राहत येत्या लोकसभा निवडणुकीला भाजपाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्राच्या १ कोटी ३८ लाखांच्या निधीतून जलजीवन मिशनमार्फत येवती येथील पाणीपुरवठा योजना साकारली जात आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून, येत्या काळात सांगाल ती योजना कराड दक्षिणेत आणण्याचे काम भाजपा करणार असल्याची खात्री डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
विक्रम पावसकर म्हणाले, कृष्णा हॉस्पिटल नसते तर या तालुक्यात कोरोना काळात किती प्राणहानी झाली असती, याचा विचारच न केलेला बरा! येत्या काळात कराड दक्षिणची धुरा अतुलबाबांच्या हातात दिल्यास कराड दक्षिणचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेबरोबरच तत्पूर्वी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे.
मारुती शेवाळे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सागर शेवाळे यांनी आभार मानले. यावेळी जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे, उपअभियंता सुनील बसुगडे, कनिष्ठ अभियंता सौ. एस. एस. पाटील, माजी सरपंच शिवाजी शेवाळे, रत्नाप्पा कुंभार, अमोल शेवाळे, महेश बोरगावकर, दीपक लोखंडे, विठ्ठल बलशेटवार, राजू इनामदार यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालकाच्या ‘शेर’ला मंत्र्यांची दाद....
डॉ. अतुल भोसले भाषणाला उभे राहत असताना या सोहळ्याचे सूत्रसंचालक रामभाऊ सातपुते यांनी अतुलबाबांच्या संदर्भात एक शेर सादर केला. ‘मंजिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान हो । पंख से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है । जिसके है बुलंद हौसले, ओ है डॉ. अतुल भोसले ।’ सूत्रसंचालकाच्या या शेरला केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी विशेष दाद देत, श्री. सातपुते यांचे कौतुक केले.



Comments
Post a Comment