सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन...
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन...
कराड, दि.21 : कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची गुरुवार दि. २२ डिसेंबर रोजी ९८ वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन केले जाईल.
स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रूग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत.
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गुरुवारी ( २२) कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. तसेच स्थानिक पातळीवर विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गंत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे दुपारी १२ वाजता हेमंत धर्मे मित्रपरिवार व मल्लयोद्धा ग्रुपच्यावतीने भव्य श्वान शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, याचा बक्षिस वितरण सोहळा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता रेठरे बुद्रुक येथील सौ. ताराबाई मोहिते विद्यालयात डॉ. अतुलबाबा प्रेमी ग्रुपच्यावतीने पाटोद्याचे माजी आदर्श सरपंच भास्करराच पेरे-पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment