कराडच्या दिव्यांगाची निधी अभावी हाल;आ.बच्चू कडू यांची कराड नगरपरिषदेकडे विचारणा...
कराडच्या दिव्यांगाची निधी अभावी हाल;आ.बच्चू कडू यांची कराड नगरपरिषदेकडे विचारणा...
कराड दि.25-(प्रतिनिधी) कराड नगर परिषदे मार्फत दिव्यांग कल्याण निधीचे (disabilityfund) अद्याप वाटप न झाल्याने शहरातील दिव्यांगाची ससेहोलपट होऊ लागली आहे. शहरातील दिव्यांग नगरपालिकेत (Karad Municipal Council) प्रत्यक्ष व फोन करून संबंधित विभागास विचारणा करू लागले आहेत. मात्र सदर दिव्यांग निधी जिल्हाधिकाऱ्यांनी (Satara Collector) रोखला असून त्याबाबत दिव्यांग संघटनेसह प्रहार संघटना व कराड नगरपरिषदेकडून जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष फोन व निवेदनाद्वारे निधी वाटपाची मागणी केली जात आहे. नजीकच्या मलकापूर नगरपरिषदेने दिव्यांग निधीचे वाटप केले मात्र वर्ष संपले तरीही कराड नगरपरिषदेकडून सदर निधीचे दिव्यांगांना अद्याप वाटप झालेले नाही.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिव्यांग निधीचे तातडीने वितरण करण्याचे आदेश दिले असताना सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या निधी रोखण्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील नगरपरिषदाकडून अद्याप दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे अन्य जिल्ह्यांसाठी वेगळा न्याय व सातारा जिल्ह्यासाठी वेगळा न्याय का? अशी विचारणा दिव्यांग बांधव करू लागले आहेत. चारच दिवसांपूर्वी अकोला जिल्हाधिकारी यांनी संबंधित दिव्यांग निधी तातडीने खर्च करण्याचे आदेश काढले आहेत.
दरम्यान कराड नगर परिषदेच्या दिव्यांग कल्याण राखीव निधीचा खर्च करण्याबाबत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे परवानगी मिळण्याबाबत विनंती केली आहे. कराड नगरपरिषद प्रतिवर्षी दिव्यांगासाठी पाच टक्के राखीव निधीतून 25 लाख रुपयांची तरतूद करीत असते. कराड शहरात साडेतीनशेहून अधिक दिव्यांग लाभार्थी असून प्रति लाभार्थी वार्षिक रक्कम साडेसात हजार रुपये प्रमाणे दिव्यांगांच्या खात्यावर हा निधी बँकेमार्फत वर्ग केला जातो. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये जिल्हाधिकारी यांनी कराड नगर परिषदेला निधी वाटप करू नये असे आदेश दिले आहेत.
कराड शहरातील बहुतांशी दिव्यांग लाभार्थी यांच्या आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून त्यांची उपजीविका ही नगरपरिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानावर अवलंबून आहे. अनुदान वेळेवर वितरित न झाल्यामुळे दिव्यांगांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे दिव्यांग लाभार्थी व दिव्यांग संघटना वारंवार निधी वितरणाबाबत प्रत्यक्ष भेटून निवेदन देत आहेत. या परिस्थितीचा विचार करून दिव्यांग कल्याण साठी पाच टक्के राखीव निधीपैकी काही रक्कम खर्च करण्याची परवानगी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सातारा जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांच्याकडे मागितली आहे. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याकडे याबाबतची तक्रार गेल्यानंतर बच्चू कडू यांनी आज कराड नगर परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातील दिव्यांग विभागाचे काम पाहणाऱ्या प्रतिनिधींना फोनवरून विचारणा करत संबंधित निधी दिव्यांगांना अद्याप का दिला नसल्याचे विचारणा केली. यावर सदर निधी हा सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रोखलेची माहिती संबंधित प्रतिनिधींनी आमदार कडू यांना दिली आहे.
प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश पाटील यांनीही या दिव्यांगांच्या निधीबाबत जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांच्याशी आज फोनवरून संपर्क साधून सदर दिव्यांग निधी तातडीने वितरित करावा अशी मागणी केली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.
Comments
Post a Comment