ग्रामविकासासाठी सरपंच व सदस्यांची इच्छाशक्ती महत्वाची : भास्करराव पेरे-पाटील...
ग्रामविकासासाठी सरपंच व सदस्यांची इच्छाशक्ती महत्वाची : भास्करराव पेरे - पाटील...
रेठरे बुद्रुक, दि.23- प्रत्येक गावातील सरपंच व सदस्यांची इच्छाशक्ती असेल तर गावाचा विकास निश्चित घडू शकेल, असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त डॉ. अतुलबाबा प्रेमी ग्रुप व रेठरे बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने सौ. ताराबाई मोहिते विद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले होते.
प्रारंभी श्री. पेरे-पाटील, डॉ. भोसले व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच स्व. आप्पासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले गोंदीचे सरपंच सुबराव पवार व सर्व सदस्य, आटकेच्या नूतन सरपंच सौ. रोहिणी पाटील व सर्व सदस्य, जुळेवाडीचे सरपंच नितीन बाकले व सर्व सदस्य, लवणमाचीच्या (ता. वाळवा) सरपंच छाया दुधगावे व सर्व सदस्य, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील व सर्व सदस्य, वनवासमाचीच्या सरपंच उज्वला वाघमारे व सर्व सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पेरे-पाटील म्हणाले, माझ्या घरात कोणताही राजकीय वारसा नाही. सातवीपर्यंत शिक्षण झालेला मी एक साधा हॉटेल कामगार होतो. पण माझ्या गावातील लोकांनी मला ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत गावातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आणि सर्वांगीण ग्रामविकासासाठी काम केल्याने २५ वर्षे लोकांनी मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गावातील प्रत्येकाला स्वच्छ पाणी, फळांच्या झाडांची लागवड, गावाची स्वच्छता, मुलांचे शिक्षण व गावातील निराधारांचे संगोपन या बाबींची पूर्तता केली तरी ग्रामविकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, नूतन सदस्यांनी गावाच्या विकासाचा प्राधान्यक्रम ठरवून, ज्या जिद्दीने निवडणूक लढविली त्याच जिद्दीने येत्या ५ वर्षात संपूर्ण गावाच्या भल्यासाठी झपाटून काम करण्याची गरज आहे. गावाच्या विकासासाठी केंद्रातून व राज्यातून निधी मिळविण्यासाठी माझे सहकार्य निश्चितपणे राहील.
याप्रसंगी ग. स. पवार उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. अतुलबाबा प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष दिलीप धर्मे यांनी प्रास्तविक केले. भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. श्यामबाला घोडके यांनी आभार मानले. यावेळी डॉ. राजकुमार पवार, संजय पवार, विक्रम साळुंखे, अधिक साळुंखे, रामभाऊ सातपुते, माणिक साळुंखे, गणेश कदम, पोपट कदम, कृष्णत कापूरकर, सरदार मोरे, जितेंद्र साळुंखे, बबन घोडके, प्रणव धर्मे, प्रतीक धर्मे, प्रसाद साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment