प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील सस्त्यांची कामे पूर्ण करा: खा.श्रीनिवास पाटील...
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील सस्त्यांची कामे पूर्ण करा: खा.श्रीनिवास पाटील...
कराड दि.22- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रलंबित असलेली कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी नवी दिल्ली येथील बैठकीत केली.
कृषी भवन, नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्यातील प्रलंबित प्रस्तावाबाबत देशाच्या ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बुधवारी संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहून खा.श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी केली. या बैठकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, महाराष्ट्र राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांचे खासदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास संस्था मार्फत महाराष्ट्र राज्याकरीता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना-3 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील 300 किलोमीटरचे उद्दिष्ट मंजूर आहे. मात्र मागील तीन वर्षापासून सातारा जिल्ह्यात फक्त दोनच रस्ते झाले आहेत. त्यामुळे या योजनेमधील रस्त्यांची कामे तातडीने करून उद्दीष्ट पूर्ण करावे. तसेच वन क्षेत्रातून जाणा-या रस्त्यांच्या कामासंदर्भात अडचणी येत असतील तर ते रस्ते सोडून इतर सर्व प्रलंबित रस्त्यांच्या कामांना सुरूवात करण्यात यावी.
खा.पाटील यांनी केलेल्या या मागणीनुसार ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदरची कामे तात्काळ सुरू करा अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिका-यांना केल्या. यानुसार सातारा जिल्ह्यातील सुमारे 48 कामांना मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे मागील तीन वर्षापासून केंद्राच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत असलेले जिल्ह्यातील 48 रस्ते मार्गी लागणार आहेत.
खा.पाटील यांनी लोकसभेत उठवला आवाज....
खा.श्रीनिवास पाटील यांनी सदरच्या 48 रस्त्यांच्या कामासाठी तात्काळ मंजुरी मिळावी याविषयी लोकसभेत आवाज उठवला होता. त्याची दखल घेत संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्वच खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.

Comments
Post a Comment