पाचवडेश्वर-कोडोली पुलाचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन...
पाचवडेश्वर-कोडोली पुलाचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन...
कराड दि 25-.कराड दक्षिणमध्ये दळणवळणाच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरणाऱ्या पाचवडेश्वर येथील कृष्णा नदीवरील कोडोली-पाचवडेश्वर पुलाचे आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी रयत सह साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, विद्याताई थोरवडे, मंगल गलांडे, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, जयवंतराव जगताप, नानासाहेब जगताप, शिवाजीराव मोहिते, निवास थोरात, इंद्रजीत चव्हाण, नामदेवराव पाटील आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कराड तालुक्यातील दुशेरे, शेरे परिसरातील गावांसह सांगली जिल्ह्यातील होणारी वाहतूक थेट पुणे बेंगलोर महामार्गाला जोडण्यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जवळपास 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या पुलाचे बांधकाम येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. महामार्ग ते पाचवडेश्वर मार्ग कोडोली ते शेणोली स्टेशन असा रस्ता बांधण्यात आला आहे. नदीच्या दोन्ही बाजूचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र कृष्णा नदीवरील पूल बांधण्यासाठी आजवर दोनवेळा सर्व्हेही करण्यात आला होता. सदरचे काम 5054, 04, जिल्हा व इतर मार्ग यावरील भांडवली खर्च सन 2020-21 या योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. पुलाच्या कामामध्ये 40 मीटरचे आठ गाळे असून पुलाची लांबी 320 मीटर असून रूंदी साडेसात मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षक भिंत उभारण्यात येणार असून पुलाच्या दोन्ही बाजूस रस्ता बनवण्यात येणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, या पुलामुळे कोडोली, कार्वे, वडगाव हवेली, शेरे, दुशेरे तसेच सोनसळ भागात राहणारे, तासगाव कडे जाणारे तसेच पुला पलीकडील पाचवड, वाठार अशी जवळपास ३० ते ३५ गावे या पुलामुळे जोडली जातील. पाचवडेश्वर – कोडोली या पुलामुळे आसपासच्या गावांचे दळणवळण सुखकर होणार आहे त्यांचा वेळ वाचणार असल्यामुळे दैनदिन प्रवास करणाऱ्यांना या पुलामुळे दिलासा मिळणार आहे. प्रशासकीय कामांची सर्व मंजुरी पूर्ण झाली असून मंजूर झालेला निधी ४५ कोटी इतका असून लवकरात लवकर या पुलाच्या बांधकामास सुरुवात होईल.
चौकट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाचवड पुलाचे प्रत्यक्ष व रेठरे बुद्रुक पुलाचे ऑनलाईन भूमिपूजन होणार होते. त्यानुसार कार्यक्रमाची तयारी सुद्धा पूर्ण झाली होती, कार्यक्रम ठिकाणी भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा जमली होती. परंतु अचानक काही अपरिहार्य कारणामुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत यामुळे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याच हस्ते या पुलाचे भूमिपूजन पार पडले.


Comments
Post a Comment