कराड शहरातील शेकडो जाहिरात फलक नगरपरिषदेने हटवले;विनापरवाना फलक लावल्यास दंडात्मक कारवाई...
कराड शहरातील शेकडो जाहिरात फलक नगरपरिषदेने हटवले;विनापरवाना फलक लावल्यास दंडात्मक कारवाई...
कराड दि.26-(प्रतिनिधी) कराडात काल शुक्रवारी मुख्यमंत्री यांचा दौरा होता. यानिमित्त शहरभर सर्वत्र विविध चौकात तसेच दुभाजक मध्ये जाहिरातीचे शेकडो फलक लावले होते. अनेक फलकांना परवानगी ही घेतली नव्हती. या फलकामुळे शहराच्या सौंदर्यकरणाला प्रचंड बाधा पोहचली होती. याबाबत नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रार केल्यानंतर नगर परिषदेने शहरातील शेकडो फलक, बॅनर, बोर्ड, पोस्टर्स हटवण्यास सुरुवात केली आहे. तर काही जाहिरात फलक ज्यांनी लावले होते त्यांनी हे काढून घेण्यास सूरूवात केली आहे.
शहर हद्दीत कुठेही जाहिरातीचे बॅनर, फलक परवानगीशिवाय लावण्यात येऊ नयेत असा ठराव नगरपरिषदेत झाला आहे. त्यामुळे फुकट्या जाहिरातदारांना काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र तरीही नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या नजरेआड अनेक जण फलक लावताना दिसून येत आहेत. प्रशासनाला याची पुसटशीही कल्पना नसते तर काही ठिकाणी दोन बोर्डाची परवानगी घेऊन चार बोर्ड लावल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या संबंधित जाहिरात दारावर कारवाईचा बडगा ही उगारला आहे, परंतु या कारवाई मध्ये सातत्य राखता आलेले नाही.परिणामी सर्रास विना परवाना जाहिरात फलक लागले जात आहेत.
मुख्यमंत्री कराडला येणार म्हणून गेल्या तीन दिवसापासून शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे बोर्ड ठीक ठिकाणी लावण्यात आले होते. शहरातील विविध चौकासह रस्त्यावरील दुभाजकामध्ये असणारी झाडे तसेच विद्युत पोल याच्यावरही फलक लावण्यात आले होते तर काही खाजगी मालमत्ता वर ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहिरात बोर्ड झळकले होते. अशाच एका फलकावरून मंगळवार पेठेत दोन दिवसापूर्वी खडाखडी ही झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
दरम्यान आज सकाळी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनुसार नगर परिषदेचे वरिष्ठ मुकदम मारुती काटरे व आरोग्य विभागाच्या टीमने तात्काळ ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने ठिकठिकाणी असणारे जाहिरात फलक, बॅनर, होर्डिंग हटवण्यास सुरुवात केली आहे. अनेक फलक नगरपालिकेने जप्त केले असून काही फलक ज्यांनी लावले होते त्यांनी काढूनही घेतले आहेत. नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी तात्काळ हे जाहिरात फलक हटवल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.


Comments
Post a Comment