कराड तालुका ग्रामपंचायत निवडणूक;सरपंच पदासाठी 9, तर सदस्य पदासाठी 20 अर्ज दाखल...
कराड तालुका ग्रामपंचायत निवडणूक;सरपंच पदासाठी 9, तर सदस्य पदासाठी 20 अर्ज दाखल...
कराड, दि. 28 (प्रतिनिधी) - कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. आज सरपंच पदासाठी 9 अर्ज दाखल झाले असुन सदस्य पदासाठी एकूण 20 अर्ज दाखल झाले आहेत.यामध्ये हनुमानवाडी 1, आणे 1, कोरेगाव 1, आटके 2, तळबीड 3 आणि वडगाव हवेली 1 असे 9 अर्ज सरपंच पदास्ठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात सदस्य पदासाठी हवेलवाडी 2, आणे 7, पश्चिम सुपने 1, आटके 4, तळबीड 2 आणि वडगाव हवेली 4 असे एकूण 20 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
आज 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. बुधवार दि. 7 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ बुधवार दि. 7 डिसेंबरला दुपारी 3 वा. नंतर. आवश्यकता भासल्यास रविवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वा. पासून सांय. 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी मंगळवार दि. 20 डिसेंबर रोजी होईल. तर शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.
कराड तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 44 ग्रामपंचायतीचा समावेश असून यामध्ये साबळवाडी, अंधारवाडी, आटके, आणे, आरेवाडी, कळंत्रेवाडी, कुसुर, किवळ, कोरेगाव, गणेशवाडी, गोंदी, cघराळवाडी, घोलपवाडी, चिंचणी, चोरजवाडी, जुने कवठे, जुळेवाडी, दुशेरे, धावरवाडी, पाडळी हेळगाव, मनू, रेठरे खुर्द, वनवासमाची, वानरवाडी, हनुमंतवाडी, हनुमानवाडी, हवेलवाडी, हिंगनोळे, अंतवडी, ओंडोशी, कालगाव, कासारशिरंबे, डेळेवाडी, तळबीड, तारुख, मस्करवाडी, येळगाव, वडगाव हवेली, विजयनगर, शामगाव, सुपने, भांबे, पश्चिम सुपने, चरेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
दरम्यान आज पासून ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून या पार्श्वभूमीवर प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय परिसरात कराड तालुक्यातून प्रचंड गर्दी होऊ लागले आहे. त्यामुळे शहर पोलीस स्टेशन, संभाजी मार्केट, प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय, शाहू चौक व विश्रामगृह या परिसरातील रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे आज पहिल्या दिवशी दिसून आले. संबंधित वाहतूक प्रशासनाला या नियोजित कार्यक्रमाची माहिती असून देखील आज दिवसभरात यावर अंमलबजावणी झाले नसल्याचे संध्याकाळी झालेल्या वाहतूक जामवरून स्पष्ट होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता या वरील संबंधित ठिकाणी खेडे गावातून येणाऱ्या नागरिकांची तसेच त्यांच्या वाहनांची संख्या वाढणार असून पार्किंगची व्यवस्था तसेच संबंधित प्रशासकीय कार्यालयात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे.या गर्दीमुळे व जून्या पूलावरील वाढलेल्या वाहतूकीमुळे सर्वात अधिक वाहनांची कोंडी शाहू चौकात होत असते व याचा त्रास शहरात येणार्र्या जाणार्या नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे.शाहू चौकात वाहतूक पोलिस तैनात करणे गरजेचे आहे.


Comments
Post a Comment