कलाविष्कार शिबिरातून सरस्वतीच्या विद्यार्थ्यांनी घेतला कला विकासाचा ध्यास...

 


कलाविष्कार शिबिरातून सरस्वतीच्या विद्यार्थ्यांनी घेतला कला विकासाचा ध्यास...

कराड दि.25-जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय, कराड येथे शालेय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम अंतर्गत तीन दिवसीय कलाविष्कार २०२२ या निवासी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव अनिल कुलकर्णी, संचालक डॉ.प्रकाश सप्रे, दीपक कुलकर्णी, सुनील मुंद्रावळे, श्रीपाद कुलकर्णी,  सौ. रुपाली तोडकर व सौ.शरयू माटे उद्घाटन समारंभास उपस्थित होते.

सर्व संचालक यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांच्या कल्पनेतून शिबिराध्यक्ष दीपक पाटील, स्वागताध्यक्ष सौ.सोनाली जोशी यांच्या नियोजनातून सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या तीन दिवसीय कालावधीत शिबिरात विविध कला विषयाचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह, कृतियुक्त सत्रांचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या पहिल्या  दिवशी शाळेचा माझी विद्यार्थी व यशस्वी व्यावसायिक निरंजन सुर्यवंशी यांनी केश रचना या विषयावर प्रात्यक्षिकासह हेअर सायन्स व स्किन सायन्स या विषयावर मार्गदर्शन केले.

वैभवशाली प्राचीन खेळ ट्रस्ट, नाशिक चे अध्यक्ष सोज्वळ साळी यांनी भारतील २००० वर्षपूर्वीचे पट खेळ यांची दहा प्रकारचे वैशिष्ट्य पूर्ण खेळ व त्या खेळांचे संशोधन या विषयावर कार्यशाळा घेतली. शिबिरामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी हे सर्व खेळ खेळले.

शिबिरातील संध्याकाळ च्या वातावरणात विविध मैदानी  मनोरंजक खेळाच्या सत्राने विद्यार्थ्यांच्या चैतन्य निर्माण झाले. भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या गोष्टी भारताच्या या सत्रात कोल्हापूरच्या इंद्रनील बंकापुरे यांनी मंदिरे, मूर्तिकला व मूर्तीशास्त्र या विषयाचे संशोधन, अभ्यास विषयावर छायाचित्रासह मार्गदर्शन केले. शिबिरात सर्व शिक्षकांनी मिळून विविध विषयावर १६५ विद्यार्थ्यांची पथनाट्य बसविली.

शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पहाटे ५.१५ मिनिटांनी सुरू झाली. प्रात:स्मरण, सूर्यनमस्कार, व्यायाम नंतर सकाळी ७ ते ८.३० हास्याचा कलाविष्कार या सत्रात प्रीतिसंगम हास्य परिवाराचे सदस्यांनी २५ पेक्षा जास्त प्रकारच्या हास्यकला विद्यार्थ्याना प्रात्यक्षिकासह शिकवल्या.हास्य परिवाराच्या सदस्यांचे स्वागत संचालक श्री.नितीन गिजरे यांनी केले. डी.एस पवार यांनी जीवनात हास्याचे महत्व विद्यार्थांना सांगून मनसोक्त विद्यार्थी शालेय आवारात हसवले... विद्यार्थ्यांना होणारा आनंद पाहून शिक्षक आणि दिलखुलास मनसोक्त हसणारे आपले  शिक्षक पाहून शिबिरात अत्यंत आनंदी वातावरण निर्मिती झाली.

कलाविष्कार दिनदर्शकेचा या सत्रात श्रीराम दिनदर्शिका आणि स्वराज्य ७५ या दिनदर्शिकेचे निर्माते श्री.कल्पेश पाटसकर, रितू उनऊने, अर्पिता गाडगीळ यांनी छायाचित्रण, कॅमेरा हाताळणी, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य व प्रसंग निर्मिती याबाबत अत्यंत सखोल माहिती देवून ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन करत माहिती दिली. प्रत्यक्ष साहित्य निर्मितीचा अनुभव सांगत तयार केलेल्या साहित्याचा कलाविष्कार ही सादर केले.

प्रशांत लाड यांनी हस्ताक्षर लेखन पद्धती याबाबत विविध साधनांनी खोडरबर, बांबू, टाकावू पेन, आइस्क्रीम कांडी अशा विविध १५ पेक्षा जास्त टाकावू साधनेतून कसे सुंदर लेखन केले जाते तसेच हस्ताक्षर लेखन साठी प्रत्यक्ष कृतीयुक्त मार्गदर्शन केले.

संगीत रजनी या कार्यक्रमात श्री.अनिल भुतकर यांनी व्हायोलीन त वाद्याची सविस्तर माहिती देत त्यातून निघणारे स्वर व त्यावरून विविध प्रकारची गाणी वाजवत गावून दाखवली. सौ.रंजना चोले यांनी विद्यार्थ्यांना कृतीतुक्त गाणी म्हणत उत्साह निर्माण केला.

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार इयत्ता १० वी मध्ये असणारा चि.मंदार लोहार याने संस्था अध्यक्ष शिरिष गोडबोले यांचे प्रत्यक्ष शिबिरातील विद्यार्थ्यांसमोर शाडू मातीच्या सहाय्याने अवघ्या दीड तासात शिल्प तयार केले. मंदार शिल्प तयार करत असताना महेश लोहार यांची मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांनी मंदार व महेश जी यांच्या शिल्पकले वर आधारित मुलाखत घेवून त्यांच्या कलेचे व मंदार चे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर सादर केले.

साहसी खेळाचा कलाविष्कार या सत्रात श्री छावा युवा मंचच्या सदस्यांनी तलवारबाजी, दानपट्टा, लाठीकाठी, कुऱ्हाडबाजी, भाला चालविणे, अग्नीचक्र, याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारे साहसी खेळ दाखवत विद्यार्थ्यांना शिवकालीन घोषणा देण्यास प्रवृत्त केले. खेळ पाहताना विद्यार्थांच्या देशभक्तीने प्रेरित घोषणांनी वातावरण भारावून टाकले.

शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात विक्रम गरुड, चेतन चव्हाण, जितेंद्र परांजपे यांनी शंखनाद ( बिगुल ), वेणू ( बासरी), वाद्य तसेच अन्य वाद्यांची माहिती व वादन सादर केले.

अर्कचित्राचा कलाविष्कार या सत्रात अर्कचित्रकार चि.हृषिकेश उपळाविकार व प्रा.सतीश उपळाविकार यांनी व्यंगचित्र व चित्रात रेषांचा प्रभावी वापर कसा करावा, व्यंगचित्र व अर्कचित्र यातील फरक तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची रेषांच्या सहाय्याने एक मिनिटात चित्र काढून दाखवले. हृषिकेश याने संस्थेचे उपाध्यक्ष तूकाराम चव्हाण यांचे अर्कचित्र काढून सर्व शिबिरातील विद्यार्थ्यांची दाद मिळवली.

कलाविष्कार २०२२ निवासी शिबिरात १६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कला व कलाकार यांचा प्रत्यक्ष सहवास, मार्गदर्शक, यांचे व्यक्तिमत्त्व, जवळून अनुभवता आले. 

तीन दिवसीय चाललेल्या या निवासी शिबिराचा समारोप समारंभ जनकल्याण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, सचिव अनिल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

' कलाविष्कार ' शिबिराच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांसमोर सादर केलेल्या कला क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रेरणा घेवून आपल्यातील कला, आवड, छंद लक्षात घेवून सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात आपला ठसा उमटवावा. असे सचिव अनिल कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात मत मांडले.  

शिबिरातील वर्तन, सामाजिक सहभाग, उपक्रमातील सक्रिय सहभाग, हे लक्षात घेवून शिबिरातील तीन विद्यार्थ्यांना डॉ.प्रकाश सप्रे यांच्या वतीने कु. वरदा चव्हाण, कु. मधुजा सुर्वे, चि.समर्थ करपे यांना 'उत्कृष्ट शिबिरार्थी ' म्हणून पारितोषिक देवून गौरविण्यात आले. शिबिरातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सौ अनुराधा कुलकर्णी यांनी सायं वंदना घेतली. शिबिरातील तंत्रज्ञानसाठी सौ.अबोली फणसळकर यांनी सहाय्य केले.

शिबिरात उपक्रम प्रमुख सौ.गौरी जाधव, सौ. रुपाली पाटील, सौ.स्मिता पतंगे यांनी कार्य पाहिले. भोजन विभागात सुवर्णा काटकर, दिपाली काकडे, शिल्पा भुतकर, अवधूत तांबवेकर यांनी जबाबदारी पार पाडली. गट प्रमुख म्हणून राहुल मोरे, प्रशांत मुंढेकर, विद्यादेवी जाधव, स्वाती जाधव, प्रतिभा चव्हाण यांनी जबाबदारी सांभाळली.

शिबिराच्या यशस्वितेसाठी सर्व कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी सहकार्य केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक