स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपरिषद पून्हा देशात अव्वल....
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपरिषद पून्हा देशात अव्वल;राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान...
कराड दि.24-(प्रतिनिधी) माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्या कराड नगरपरिषदेने पुन्हा एकदा देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सलग चार वर्षे नगरपरिषद ही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सातत्याने अव्वल राहिली आहे. यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शेकडो नगर परिषदांमध्ये कराड नगरपरिषद ही पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. एक ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यासाठीची निमंत्रण कराड नगर परिषदेला प्राप्त झाले आहे.
2018 साली सुरू झालेला हा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कराड नगरपरिषदेचा प्रवास हा कायम अव्वल राहिला आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदा गटात कराड नगर परिषदेने सातत्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणात काहीसा तांत्रिक बदल झाला असला तरी नगरपरिषदेने त्याचेही आव्हान स्पर्धेत यशस्वी पार पाडले.तत्कालिन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने सलग दोन वर्षे नगरपरिषद देशात प्रथम क्रमांकावर आली होती.
नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर.डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए आर पवार, पालिकेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, तत्कालिन नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावल्याने देशात कराड नगरपरिषद अग्रक्रमाने स्पर्धेत अव्वल राहिली आहे.
दिल्ली येथे 29 व 30 सप्टेंबर रोजी देशातील अव्वल ठरलेल्या नगरपरिषदांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कलाकृती तसेच राबवलेले उपक्रमावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन ही केले असून कराड नगरपालिका ही या प्रदर्शनात भाग घेणार आहे. दोन दिवसाच्या प्रदर्शनानंतर एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या केंद्रीय समितीने पाठवलेल्या या निमंत्रणात महाराष्ट्रातील पाच नगरपरिषदेचा समावेश आहे.यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड व पाचगणी नगरपरिषदेचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सूरूवातीला सलग दोन वर्षे कराड नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता.तर तिसर्या वर्षी दूसरा तर आता ही पहिल्या पाच मध्ये कराडचा समावेश झालेले आहे. याचा अंतिम निकाल व क्रमवारी एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभातच घोषित करण्यात येणार आहे.
कराड नगरपरिषदने पहिल्या दोन वर्षी सलग देशात प्रथम क्रमांक मिळवला होता तर तिसऱ्या वर्षी दुसरा क्रमांक मिळाला होता. यावर्षीही पहिल्या एक ते पाच क्रमांकात कराड नगर परिषदेचा समावेश असून यावर्षीही नगरपरिषद देशात अव्वल राहणार असुन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment