कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे शारदीय व्याख्यानमालचे आयोजन...
कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे शारदीय व्याख्यानमालचे आयोजन...
कराड दि.23-नवरात्र उत्सवात नगरपरिषदेच्या नगर वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. सन १९३२ पासुन ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु असुन यंदा ही व्याख्यानमाला ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात २६ सप्टेंबर पासुन या शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. कराडचे सांस्कृतिक, वैचारिक वैभव, शैक्षणिक संस्कारक्षम व्यासपीठ म्हणुन या व्याख्यानमालेने नावलौकीक मिळविला आहे.
१६५ वर्षाची परंपरा जपणारे हे नगरवाचनालय आज कराड शहराची शान भरली आहे. बुध्दीवंतांची गरज तर वाचनवेडया पुस्तकप्रेमी, वाचकप्रेमी, वाचकांची तहान भागविण्याचा झरा बनली आहे. या वाचनालयाची स्थापनाच १८५७ ची, हे वर्षच मुळात अखंड भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि संस्मरणीय वर्ष. या १८५७ मध्ये स्थापन झालेले हे नगरवाचनालय आजही आपल्या अखंड सेवेने, तत्परतेने विविधतेने, वाचकांची जिज्ञासूंची, अभ्यासूंची व्याख्यानमाला रसिकांची भूक भागविते आहे.
या व्याख्यानमालेत साहित्य, संगीत, कला, क्रीडा, लोककला राजकारण काव्य, कथाकथन, धार्मीक, अध्यात्मिक, इत्यादी विविध विषयावरील व्यासंगपूर्ण अभ्यासू व नामवंत वक्त्यानी गेल्या ८९ वर्षात ७०० हुन अधिक व्याख्यात्यानी आपली व्याख्याने सादर केलेली आहेत. या थोर विचारवंताचें विचार कराडकरांच्या चिरंतर स्मृतीत कायमचे राहिले आहेत.
या व्याख्यानमालेबरोबरच कराड नगरपरिषदेचे सार्वजनिक ग्रंथालय एक आदर्श ग्रंथालय म्हणून नावलौकिक मिळविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित झालेले हे ग्रंथालय या शारदीय व्याख्यानमालेच्या रुपाने एक सांस्कृतिक वारसा जोपासत आहे.
व्याख्यानमालेस श्रोत्यांची गर्दी असते. कराडला येवुन शारदीय व्याख्यानमालेत आपली हजेरी लावण्यातही वक्त्यांना आपला गौरवच वाटतो, म्हणुन नामवत वक्तेही या शारदीय व्याख्यानमालेत सहभागी होण्यास उत्सुक असतात.
सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचा शुभारंभ ठाणे येथील सौ. धनश्री लेले यांच्या 'अष्टलक्ष्मी' या व्याख्यानाने होणार आहे. मंगळवार दि.२७ रोजी प्रा. डॉ. प्रीती शिंदे-पाटील, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर, यांचे 'जगी सर्व सुखी असा कोण आहे ? ' बुधवार दि. २८ रोजी पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे येथील आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे 'मी एक स्वप्न पाहिलं, गुरुवार दि. २९ रोजी प्रा. गणेश शिंदे, अहमदनगर यांचे 'जीवन सुंदर आहे.' शुक्रवार दि. ३० रोजी डॉ. अभिजीत सोनवणे, सोहम ट्रस्ट, पुणे, यांचे ' भिक्षेकरी ते गावकरी' शनिवार १ आक्टोंबर रोजी आंतरराष्ट्रीय संबंध विभाग, मुंबई विदयापीठ, येथील संचालक प्रा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर मुंबई, यांचे 'भारतीय परराष्ट्र धोरणाची ७५ वर्षे , २ आक्टोंबर रोजी डॉ. अंजली जोशी, मुंबई, यांचे 'मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली', सोमवार ३ आक्टोंबर रोजी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, अकोला यांचे 'कवितेतील जगणं, जगण्यातल्या कविता मंगळवार दि. ४ आक्टोंबर रोजी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ नेत्रतज्ञ, मुंबई यांचे 'शुन्यातून विश्व ' अशाप्रकारे एकूण ९ व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत.
या सर्व व्याख्यानास कराडच्या रसिक श्रीतृवृंदानी, विद्यार्थीवर्गानी बहुसंख्येने उपस्थित राहून त्याचा व्याख्यांनाचा घ्यावा, अशी विनंती प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके, यांनी केली आहे. वरील सर्व व्याख्याने यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे दररोज सायं. ६.३० वाजता होणार आहेत.
Comments
Post a Comment