दक्षिण मांड नदीवरील पुलामुळे काले गावचा परिसर सुधारेल : आ. पृथ्वीराज चव्हाण....
दक्षिण मांड नदीवरील पुलामुळे काले गावचा परिसर सुधारेल : आ. पृथ्वीराज चव्हाण....
कराड दि.29 (प्रतिनिधी) : काले येथे दक्षिण मांड नदीवर कमी उंचीचा पुल असल्याने या विभागातील लोकांना अनेक अडचणी यायच्या. दळणवळण करताना लोकांना जीवघेणे प्रसंग यायचे. या अडचणीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी उंच पुल व्हावा, याकरिता मी प्रयत्न केले. आज उंच पुलाच्या उभारणीमुळे या विभागाचे अर्थकारण बदलणार असून, या कामाचे मला मोठे समाधान आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
काले (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून दक्षिण मांड नदीवर उंच पुल, पोहच मार्ग व संरक्षक भिंत उभारणी तसेच बंदिस्त गटार अशा सुमारे पाच कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्धघाटन समारंभात ते बोलत होते.
कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, संयोजक पै. नानासाहेब पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जि.प सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगलताई गलांडे, विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, नरेंद्र नांगरे - पाटील, शिवाजीराव मोहिते, बाळासाहेब थोरात - सवादेकर, दादासाहेब पाटील, रणजित देशमुख, उदय पाटील (आबा) - उंडाळकर, दिलीप पाटील, संताजी थोरात, नितीन थोरात, शैलेश पाटील, धैर्यशील सुपले, संजय तडाखे, आण्णासाहेब जाधव, यशवंतराव चव्हाण - पेरलेकर, पोपटराव पाटील, सुभाषराव पाटील, रघुनाथराव पाटील, आबासाहेब शेवाळे, अमित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, एका पुलामुळे काले गावचा आणखी विकास होणार आहे. या गावच्या महत्वाच्या दोन कामांचे मला मोठे समाधान आहे. सरकार बदलले असले, तरी कराड दक्षिणमध्ये विकासकामे कमी पडणार नाहीत.
ते म्हणाले, शिंदे व भाजप सरकार बेकायदेशीर आहे. मोदी सरकारच्या दबावापुढे सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घेताना अडचण होत आहे. शिंदे सरकार आल्यानंतर सर्वत्र नारळ फोडफोडी सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामध्ये अनेक जण नाराज होतील.
ते म्हणाले, राज्यातील सरकार टिकेल की नाही, हे कळत नाही. काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे. याकरिता आम्ही सोनिया गांधी यांना पत्र दिले होते. अध्यक्ष होण्यासाठी राहुल गांधी यांनाही विनंती केली, पण ते तयार नाहीत. आमच्या मागणीचा सोनिया गांधी यांनी विचार करत काँग्रेस अंतर्गत निवडणुका येत्या सतरा ऑक्टोंबरला होत आहेत. निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष मजबूत व बळकट होईल.
प्रा. धनाजी काटकर म्हणाले, कराड दक्षिणेतील जनतेने काँग्रेसची विचारधारा जपली आहे. काँग्रेसचा विचार जनतेने मनापासून जपला पाहिजे. मनोहर शिंदे म्हणाले, जे काम आपले आहे. ते आपले आहे, ते सांगण्याची आवश्यकता आहे.
पैलवान नानासाहेब पाटील यांनी स्वागत केले. डी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पैलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवारातील सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप म्हणाले, पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणमध्ये विकासाचे जे धोरण राबवले ते अद्वितीय आहे. जिल्हा नियोजन मंडळातून बाबांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी भरगोस निधी प्राप्त होत असतो. त्या कामाचे श्रेय घेवून काही लुंगेसुंगे नारळ फोडत आहेत. तीच व्यक्ती जिल्हा नियोजन मंडळात स्वीकृत सदस्य होते. व ते सहाव्या लाईनमध्ये बसायचे. त्यांना आमदार होण्याची घाई झाली आहे. रेठरे बुद्रुकमध्ये महादेव आमदार ही व्यक्ती आहे. त्यांच्यासारखे या व्यक्तीला आमदार हे टोपण नाव दिले पाहिजे. असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Comments
Post a Comment