कराड नगरपरिषद कर्मचार्यांनी बनवली रद्दीतील कागदापासून गणेश मूर्ती....
नगरपरिषद कर्मचार्यांनी बनवली रद्दीतील कागदापासून गणेश मूर्ती....
कराड दि.31 (प्रतिनिधी) कराड नगरपालिकेचे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षण, माजी वसुंधरा अभियान असो किंवा अन्य उपक्रमात टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू व सुंदर कलाकृती करून त्याच्या माध्यमातून नागरिकांना विविध संदेश देण्याचा काम करीत आहेत. असाच संदेश यावर्षी गणेशोत्सवात या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. चक्क कागदाच्या रद्दीपासून आकर्षक गणेश मूर्ती तयार केली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांच्या सूचनेनूसार कर्मचार्यांतील कलाकार किशोर कांबळे यांच्यासह सोनू चव्हाण, योगेश उथळे, सागर सातपूते, श्रीकांत कांबळे, भास्कर काटरे, अतूल माने व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी मिळून ही मूर्ती बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
कराड नगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा ही घेतली होती. या कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील नागरिकांना विविध प्रकारे आव्हान करून कृत्रिम जल कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन करावे यासाठी ही प्रयत्न सुरू ठेवले आहेत.गेली अनेक वर्षे जलकूंडात मूर्तींचे विसर्जनाचे प्रमाण वाढले आहे.
नगरपरिषदने गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दहा किलो वर्तमानपत्राची रद्दीचा लगदा करुन व अन्य कागदापासून सुबक अशी गणेश मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. गणेश उत्सवाच्या आगमनादिवशी आज ही गणेश मूर्ती पूर्णत्वास गेली आहे. अत्यंत सुबक आशा या तीन फूटांपेक्षा उंच गणेश मूर्तीवर पर्यावरण पूरक रंगांचा ही वापर केला आहे.


Comments
Post a Comment