वाठारची पाणीयोजना आदर्शवत करा : आ. पृथ्वीराज चव्हाण...
वाठार : येथील पाणीयोजनेच्या भूमिपूजन प्रसंगी आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत गजानन आवळकर, अविनाश पाटील व इतर...
वाठारची पाणीयोजना आदर्शवत करा : आ. पृथ्वीराज चव्हाण...
कराड दि. 30-: वाठार गावाला होणारी पाणीयोजना महत्वाची व ग्रामस्थांचे आरोग्य टिकवणारी योजना आहे. जागतिक बँकेच्या सहकार्यातून मी मुख्यमंत्री असताना तालुक्यात सहा गावच्या योजना केल्या. त्यामधील रेठरे बुद्रुकची योजना अजूनही रेंगाळत पडली आहे. मी उंडाळे प्रादेशिक योजना जिवंत करण्यासाठी प्रयत्न केले. यावर्षीपासून टप्प्याटप्प्याने उंडाळे प्रादेशिक योजना कार्यान्वित होणार आहे, असे सांगून वाठारला योजना आणण्यासाठी गेली सात वर्षे आमचे प्रयत्न सुरू होते. मलकापूरप्रमाणे ही योजना राबवावी. व आदर्शवत करावी. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
वाठार (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजनेच्या साडेपाच कोटी रुपये कामाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
संयोजक गजानन आवळकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रकाश पाटील - सुपनेकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अविनाश पाटील, अविनाश नलवडे, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मंगलताई गलांडे, विद्याताई थोरवडे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, गीतांजली थोरात, काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, नरेंद्र नांगरे - पाटील, शिवाजीराव मोहिते, दादासाहेब पाटील, मारुती मोहिते, झाकीर पठाण, धैर्यशील सुपले, दुर्गेश मोहिते, हेमंत जाधव, जलजीवन योजनेचे उपअभियंता श्री. कमलापती यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, मलकापूरच्या पाणी योजनेच्या यशाचे गमक स्वयंचलित मीटर असून, त्या धर्तीवर वाठार गावची योजना आदर्शवत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, याकामी माझे सहकार्य राहील. या गावाची गजानन आवळकर यांनी सेवा केली आहे. या गावासाठी मी झुकते माप दिले. वाठारच्या पाणीयोजनेच्या श्रेय वादाची लढाई सुरू आहे. रात्रीच्या वेळेत येवून भूमिपूजन करायचा हा विरोधकांचा बालिशपणा आहे. आम्ही पाच कोटी रुपये विकासनिधी आणला. तुम्ही पंचवीस कोटी आणा, असेही ते शेवटी म्हणाले.
गजानन आवळकर म्हणाले, गेली सात वर्षे मी वाठारला पाणी योजना आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर असल्यापासून पाणी योजनेसाठी प्रयत्न करत आहे. पण मध्येच कोण तरी येवून या योजनेचा नारळ फोडून जात आहे. गावच्या पाण्याच्या अडचणीची जाणीव ठेवून मी या कामासाठी 2015 सालापासून अहोरात्र प्रयत्न केले. पृथ्वीराज बाबांनी हात ढिला सोडल्यामुळे गावासाठी चाळीस कोटीचा निधी आणता आला. वाठारला आता ट्रीपल फिल्टर पाणी मिळणार आहे.
प्रा. धनाजी काटकर म्हणाले, विरोधक कराड दक्षिणमध्ये दिशाभूल करत विकासकामांचे श्रेय घेत आहेत. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. वाठार गावच्या विकासात पृथ्वीराजबाबांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
शिवराज मोरे म्हणाले, दुसऱ्यांच्या वस्तू लाटण्याचा विरोधकांना नाद आहे. त्यांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट लाटला. हीच मंडळी आता विकासकामांचे श्रेय लाटत आहेत.
अजितराव पाटील - चिखलीकर म्हणाले, सरकार बदलले की, विरोधकांना चिंचा खाव्या वाटतात. रेठरे बुद्रुक येथील योजना सुद्धा बाबांनी मंजूर केली. त्या योजनेची दहा टक्के लोकवर्गणीची अट बाबांनी रद्द केली. विकासाचा बॅकलॉक भरून काढतो, असे म्हणणाऱ्या अतुल भोसले यांनी यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील - उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाणांनी केलेली कामे मतदारसंघांतील जनतेला सांगावी. त्यांना पडायचा तर पृथ्वीराज बाबांना निवडून यायचा नाद आहे. त्यामुळे तुम्ही कशाला नाद करता. भानुदास माळी, श्री. कमलापती यांची भाषणे झाली.
प्रभाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. विलास पाटील व दिग्विजय पाटील यांनी स्वागत केले. दिपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.
जयवंतराव जगताप म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत. त्यांच्या शर्टवर सुद्धा डाग नाही. तर विरोधक भ्रष्ट आहेत. ते कृष्णा कारखाना सुद्धा ठेवणार नाहीत. त्यांच्याकडे गठुळी मिळतात म्हणून कार्यकर्त्यांची गर्दी आहे. काँग्रेसकडे निष्ठेची लोक गर्दी करतात, हा फरक आहे.

Comments
Post a Comment