पाटण मतदार संघात शिवसैनिकांनी भव्य रॅली काढून केले जोरदार शक्तिप्रदर्शन....
पाटण मतदारसंघातील मतदार ना. एकनाथ शिंदे आणि ना. शंभूराज देसाई यांच्या पाठीशी ठाम;मतदार संघात विविध जाहीर मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार...
मंत्री देसाई यांच्या कार्यकर्त्यांचे रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन....
दौलतनगर दि. 26:- महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात कायमच दुजाभाव केला जातो. शिवाय आमच्या तालुक्यात येवून पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल अशा वल्गना राष्ट्रवादीचे इतर नेते करतात आणि ना. शंभूराज देसाई यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा वारंवार प्रयत्न तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो हा अन्याय आता शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांना सहन होत नाही,असे सांगत तालुक्यातील शिवसैनिकांनी शिवसेना नेते ना.एकनाथ शिंदे आणि ना. शंभूराज देसाई यांच्या समर्थनार्थ आज तालुकाभर रँली काढून जाहीर मेळावे घेतले.
यावेळी महाविकास आघाडीच्या जबड्यात अडकलेल्या शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी ना.एकनाथ शिंदे यांनी उचललेले पाऊल आणि त्याला ना. शंभूराज देसाई यांच्या सह बहुतांशी सेना आमदारांनी दिलेला पाठिंबा हा योग्यच आहे.या निर्णयाचे आम्ही शिवसैनिक स्वागत करतो, गावपातळीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांचे नेहमीच खच्चीकरण केले आहे. गत अडीच वर्षातमध्ये वर महाविकास आघाडीमधून एकत्र आणि गावपातळीवर,तालुका व जिल्हा पातळीवर एकमेकांच्या विरोध करुन संघर्ष करायचा, ही बाब वारंवार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे.परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने यावर निर्णय घेणे अवघड जात होते.त्यामुळे शिवसेनेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पाटण तालुक्यात गत अडीच वर्षांच्या काळात कोवीड संसर्गाचा कालावधीनंतर ना. शंभूराज देसाई यांनी गावा-गावातील अनेक विकासाची कामे मंजूर केली.परंतु ही कामे राष्ट्रवादीने केली,राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केली असा ढिंडोरा पिटून त्या कामांचा उद्घाटनाचा घाट तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घातला.युती सरकारच्या काळात तालुक्यात ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून प्रचंड मोठी विकासकामे झाली परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात मर्यादा आली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकप्रतिनिधींसह सर्व सामान्य कार्यकर्त्यांची होणारी घुसमट लक्षात घेऊन शिवसेना पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, ही भुमिका सर्व शिवसैनिकांची होती ती ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुर्ण झाली आहे.
पाटण तालुक्याला मंत्री पद मिळावे म्हणून ना. एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला आणि त्यांच्यामुळे आज ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून तालुक्याला मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक सदैव ना. एकनाथ शिंदे आणि ना. शंभूराज देसाई यांच्या सोबत आहेत. पाटण तालुक्यातील शिवसैनिक नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहील आणि यापुढील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका ह्या राष्ट्रवादीच्या विरोधातच लढायच्या असा निर्धार या मेळाव्यात शिवसैनिकांनी केला.
तालुक्यात नाडे, ढेबेवाडी, मोरगिरी, तारळे, चाफळ, कोयना, मल्हारपेठ येथे हे मेळावे घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, बबनराव भिसे, प.स.सदस्य संतोष गिरी, सुरेश पानस्कर, कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण,ॲड. डी.पी.जाधव, ॲड.मिलिंद पाटील, सरपंच विष्णू पवार, जयवंतराव पवार, प्रविण पाटील, विजयराव मोरे, जे.ए. पाटील, विजय शिंदे, माजी प.स.सदस्य पंजाबराव देसाई, मनोज मोहिते, दिलीपराव जानुगडे, रणजित पाटील, जोतीराज काळे, सागर नलवडे नाना साबळे आदिंसह शिवसैनिक हजर होते यावेळी तालुक्यात सर्वच विभागातून रँली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करत ना.एकनाथ शिंदे व ना.शंभूराज देसाई यांचेसह समर्थक आमदारांनी घेतलेल्या भूमिकेचे जाहिर समर्थन करण्यात आले.
मंत्री शंभूराज देसाई यांचे व्हाईस कॉल द्वारे शिवसैनिकांना आवाहन...
दरम्यान आम्ही ना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० ते ४२ आमदार शिवसेना पक्षातच असून शिवसेना पक्षातच राहणार आहे.कोणीही शिवसेना पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य मतदारसंघातील तमाम शिवसैनिकांनी करू नये तसेच सर्व शिवसैनिकांनी शांततेचे पालन करावे असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्हाईस कॉल द्वारे मतदारसंघातील जनतेला केले आहे.
Comments
Post a Comment