कराडात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावल्या प्रकरणी दोघां विरोधात पोलिसात गून्हा दाखल...
कराडात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड काढताना नपा कर्मचारी...
कराडात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावल्या प्रकरणी दोघां विरोधात पोलिसात गून्हा दाखल...
कराड दि.23 (प्रतिनिधी) कराड शहरात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावल्या प्रकरणी कराड नगरपरिषदेने आज बनवडी येथील सचिन राऊत व मलकापूर येथील शिवानी देसाई यांच्या विरोधात कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसापासून कराड शहरात विविध ठिकाणी झाडावर, डिव्हायडर मधील झाडे व इलेक्ट्रिक खांबावर तसेच अन्य ठिकाणी विनापरवाना जाहिरात फ्लेक्स बोर्ड लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनुसार आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन विनापरवाना लावलेले फ्लेक्स बोर्ड काढून जप्त करीत कराड पोलिसात गून्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कराड शहरात कृष्णा नाका, विजय दिवस चौक, दत्त चौक, कोल्हापूर नाका, मुख्य बाजारपेठ, कृष्णाघाट या परिसरात अनेक विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. मात्र हे जाहिरात फ्लेक्स बोर्ड कोणतीही परवानगी न घेता लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनुसार आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांनी याबाबत संबंधितांकडे लावलेल्या जाहिरात बोर्ड बाबत चौकशी केली असता नगरपरिषदेकडून परवानगी न घेता काही ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित फ्लेक्स धारकांना याबाबत सूचित केले. मात्र त्याबाबत कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांनी मुकादम अभिजीत खवळे, राजाराम सपकाळ, संजय लादे तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने कृष्णा नाका ते विजय दिवस चौक तसेच कृष्णा घाट परिसरात विनापरवाना लावलेल्या फ्लेक्स बोर्ड काढून जप्त केले.
दरम्यान याबाबत आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांनी जाहिरात फ्लेक्स बोर्ड लावण्यासाठीची नगरपरिषदेकडून कोणतीही परवानगी न घेतल्याने कराड शहर पोलिसात सचिन प्रकाश राऊत रा. बनवडी ता.कराड व शिवानी देसाई रा. मलकापूर ता. कराड यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कराड शहरात जाहिराती करिता फ्लेक्स बोर्ड लावण्यासाठी नगर परिषदेची परवानगी घेणे बंधनकारक असून जर कोणी विनापरवाना शहरात फ्लेक्स बोर्ड लावत असेल तर त्यांच्या विरोधात कडक दंडात्मक तसेच पोलिसात गून्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले



Comments
Post a Comment