कराड नगरपरिषद पावसाळ्याच्या तोंडावर झाली जागी; नागरिकांना दिल्या महत्वाच्या सूचना...
कराडात धोकादायक इमारती, पूररेषेतील नागरिकांना नगरपरिषदेच्या सूचना...
कराड दि.21 (प्रतिनिधी) वर्षभर शांत असणाऱ्या कराड नगरपरिषदेला पावसाळ्यापूर्वी जाग आली असून कराड शहरातील धोकादायक इमारती, झाडां बाबत शहरातील नागरिकांना प्रशिध्दीशी दिलेल्या नोटीशीद्वारे आवाहन केले आहे. शहरात अनेक धोकादायक इमारती असून काही इमारती मोकळ्या तर काही धोकादायक इमारती वापरात आहेत. एक वर्षापूर्वी केवळ एकच धोकादायक इमारत पालिकेने पाडली होती, त्यानंतर वर्षभर नगरपरिषदेने धोकादायक इमारतीकडे दूर्लक्ष केले होते. मात्र आता पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारती व झाडांबाबत तसेच पूररेषेत असणाऱ्या नागरिकांना मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी जाहीर प्रशिध्दीपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.
कराड नगरपरिषदेने दिलेल्या जाहीर प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पाऊस, वादळ, वारा, पूर आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्याकरिता ज्या मिळकती, इमारती धोकादायक (पडावयास जीर्ण झालेल्या) झालेल्या आहेत, अथवा त्यांचा काही भाग धोकादायक झाला आहे, अशा इमारती, मिळकतीमध्ये कोणीही वास्तव्य करू नये, अशा इमारतीच्या व मिळकतीच्या संबंधित घर मालकांनी, भोगवटाधारकांनी आपल्या कुटुंबीयांची तसेच आजूबाजूच्या शेजारील रहिवासी व लगत रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची, रहदारीची संभाव्य जीवित व वित्तहानी होऊ नये या दृष्टीने धोकादायक इमारती अथवा मिळकतीचा धोकादायक भाग तातडीने उतरवून घेऊन होणारा संभाव्य धोका टाळावा. तसे न केलेने कोणतीही जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मालक, भोगवटादार या नात्याने तुमची राहणार आहे.
सदरच्या धोकादायक इमारती, मिळकती उतरविताना संबंधितांचे मालकी हक्क, इजमेंट राईटसना तसेच नगर परिषदेच्या प्रचलित बांधकाम नियंत्रण नियमावलीस बाधा होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित मालक, भोगवटादार यांची असेल. अशा तमाम धोकादायक इमारती मिळकती संदर्भात महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 195 अन्वये ही नोटीस समजण्यात यावी. खाजगी मालकीच्या मिळकती मधील जे वृक्ष धोकादायक आहेत त्या वृक्षांची उंची कमी करणे, फांद्यांचा विस्तार कमी करणे, फांद्या तोडणे, अवजड फांद्या उतरवून घेणे ही कामे तातडीने पावसाळ्यापूर्वी करून घेण्यात यावीत.
पावसामुळे कृष्णा-कोयना दोन्ही नद्यांना पूर येत असल्याने या पूरनियंत्रण रेषेमध्ये असणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वित्त व जीवित हानी होऊ नये या करिता सर्व साहित्यासह स्थलांतर करणे आवश्यक आहे. वरीलपैकी कोणत्याही धोकादायक परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी झाल्यास नगरपरिषद त्यास जबाबदार राहणार नसून त्याची सर्वस्वी जबाबदारी सदर मिळकतीचे मालक, भोगवटादार यांची राहील, याची कृपया नोंद घ्यावी.असे ही प्रशिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
Comments
Post a Comment