निरोगी आयुष्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन आवश्यक : विनय गोसावी...
कृष्णा अभिमत विद्यापीठात आयोजित कार्यशाळेचे मार्गदर्शक विनय गोसावी यांचे स्वागत करताना सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, सौ. अश्विनी शेटे व अस्मिता देशपांडे...
निरोगी आयुष्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन आवश्यक : विनय गोसावी...
कराड, दि.27 : बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी जीवनात ताणतणाव वाढत असल्याने, आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशावेळी निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात ताणतणाव व्यवस्थापन करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर विनय गोसावी यांनी केले. कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या मनुष्यबळ विभागाच्यावतीने आयोजित 'तणाव व्यवस्थापन आणि कार्य व जीवन संतुलन' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यशाळेचे उदघाटन विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे व कामगार कल्याण अधिकारी सौ. अश्विनी शेटे या प्रमुख उपस्थित होत्या.
श्री. माशाळकर म्हणाले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी नेहमीच संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित व्हाव्यात, यासाठी विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास विभागाने अशा कार्यशाळा आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून, येत्या काळात कर्मचाऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. गोसावी म्हणाले, आपल्या भावनांचा आपण करत असलेल्या कामावर आणि एकूणच जीवनावर परिणाम होत असतो. म्हणून सर्वप्रथम प्रत्येकाने रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलून, सकारात्मक विचारांचा अवलंब केला पाहिजे. इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. याचवेळी स्वतःमधील बलस्थाने ओळखून त्यांच्या कौशल्य वृद्धीकडेही अधिक लक्ष द्या. चेतन गोरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सौ. अश्विनी शेटे यांनी आभार मानले.

Comments
Post a Comment