कराडचा नवीन कृष्णा पूल अखेर वाहतुकीस झाला खूला...पण......
नवीन कृष्णा पूल अखेर वाहतुकीस झाला खूला...पण...
कराड दि.29 (प्रतिनिधी) अखेर कराड विटा रोडवरील बहुचर्चित कृष्णा पूल आज पासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. काल रात्री उशिरापर्यंत या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. गुहागर-पंढरपूर या महामार्गाच्या रुंदीकरण कामात हा नवीन कृष्णा पूल कृष्णा नदीवर बांधण्यात आला आहे. गेली काही वर्ष या पुलाचे काम सुरू होते. कोरोना व पूर काळात काही काळ या पुलाचे काम रखडले होते, मात्र गतवर्षी या पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र पूलाच्या जोड रस्त्याचे काम रखडले होते. यामुळे जुन्या कृष्णा पुलावर दोन्ही बाजूला वाहतूक वेळोवेळी विस्कळीत होत होती.
दरम्यान नवीन कृष्णा पुलावरून आज वाहतूक सुरू झाली असली तरी ही ती धोक्याची ठरते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुलाच्या जोड रस्त्यावर दोन्ही बाजूस संरक्षक लोखंडी ग्रील अद्याप बसवण्यात न आल्याने वाहनधारकांच्या साठी पुलाच्या दोन्ही बाजू धोकादायक बनणार आहेत. त्यामुळे तातडीने या पुलावर लाईट व्यवस्था व जोड रस्त्यावर दोन्ही बाजूस लोखंडी संरक्षक ग्रिल्स बसवणे गरजेचे आहे. सध्या या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र रात्रीच्या वेळेस ही तात्पुरती व्यवस्था धोकादायक ठरू शकते. संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
दोनच दिवसांपूर्वी कराडच्या ब्रिटिशकालीन कोयना पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आल्याने कोल्हापूर नाका परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी काहीशी कमी झाली आहे. तर आज नवीन कृष्णा पूल वाहतुकीस खुला झाल्याने या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहतूक पोलिसांचा तान काहीसा कमी झाला आहे.
Comments
Post a Comment