कराडात स्वरनिर्झरच्या संगीत मैफीलीने रसिक-श्रोते मंत्रमुग्ध....

 


स्वरनिर्झरच्या संगीत मैफीलीने रसिक-श्रोते मंत्रमुग्ध....

कराड दि.25-स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध झाले. अर्बन बॅन्क मुख्यालय शताब्दी सभागृह कराड येथे मैफीलीची सुरुवात खा.श्रीनिवास पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अर्बन बॅंकेचे चेअरमन सुभाषरव एरम, व्हाईस चेअरमन समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, उद्योगपती सागर जोशी व स्वरनिर्झर अकादमीच्या अध्यक्षा सौ. आलापिनी जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. 

मैफीलत सौ. आलापिनी जोशी यांनी कमी गायला जाणारा अनवट ‘राग ललितागौरी’ ने सादरीकरणाची सुरुवात केली. मींड, खेंच, लहक अशा अंगांचा वापर करत त्यांनी ‘प्रीतम सैय्या’ या विलम्बित त्रितालातील ख्यालाची बढत केली. लय अंगाने घेतलेल्या बोलांनी गायनाची रंजकता वाढली. नंतर त्रितालातील ‘मोरा मन हर लिनो’ हा पारंपारिक छोटा ख्याल तानांचे तुकडे, बोलताना, इ.द्वारे खुलवला. संत कान्होपात्रा नाटकातील ‘पतित तू पावना’ या नाट्यगीताने त्यांनी सादरीकरणाची सांगता केली. त्यांना योगेश रामदास यांनी संवादिनीसाथ तर चैतन्य देशपांडे यांनी तबलासाथ केली. 

मध्यंतरात अकादमीच्या अध्यक्षा सौ. आलापिनी जोशी यांनी अकादमीद्वारे राबवण्यात येणा-या काही उपक्रमांची माहिती दिली. यामधे 2 मे ते 8 मे 2022 दरम्यान होणारे ‘स्वरनिर्झर म्युझिक मस्ती गायन शिबीर’, 10 मे 2022 रोजी होणारे “Basics of Keyboard with functions” हे शिबीर, ‘स्वरनिर्झर क्लब’, स्वरनिर्झर आयोजित शास्त्रीय संगीत स्पर्धा अशा अनेक उपक्रमांची माहिती दिली. तसेच अधिक माहितीसाठी 9881000670 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीतील भाषणाने श्रोत्यांची मने जिंकली. सौ. अबोली फणसळकर यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.    

उत्तरार्धात प्रसिद्ध तबलावादक यशवंत वैष्णव यांनी त्यांच्या एकल तबलावादनाची सुरुवात पंजाब घराण्याच्या पारंपारिक पेशकाराने केली. त्यांना लेहेरा साथ योगेश रामदास यांनी केली. उत्तम लयकारी करत त्यातीलच कायदा, फरुखाबाद घराण्याचा त्रिस्त्र जातीचा कायदा अशा पद्धतीने आपल्या सादरीकरणात पुढे जात त्रिस्त्र जातीतले रेले, मिश्र जातीतील बंदीशी, दृतलयीतील रचना घेत उत्तरार्धात पं. मुकुंद भाले, पं. योगेश समसी या गुरूंच्या रचना, गती, तुकडे घेतले. सादरीकरणाचे समापन करताना अनेक प्रकारच्या दृतलयीतील लग्ग्या अतिशय स्पष्टपणे वाजवत केले. अनेक लयकारीयुक्त अतीदृतलयीतील तरीही तितकेच स्वच्छ स्पष्ट तबलावादन श्रोते देहभान हरपून ऐकत होते. रसिक श्रोत्यांसाठी ही एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय मैफल ठरली. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक