मंत्रालयासह राज ठाकरे व संजय राऊत यांच्या घरासमोर शेतकरी आक्रोश भोंगे वाजवणार....
अन्यथा मुंबईत शेतकर्यांचे आक्रोश भोंंगे ऐकण्यास तयार राहा...,
कराड, दि. 25 (प्रतिनिधी) -सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या वाचाळ नेत्यांचे एकमेकां विरोधात दररोज भोंगे वाजत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत भांडत असल्याने राज्यात पॉलिटिकल गँगवॉर सूरू असल्याची स्थिती निर्माण झाली असुन अशा परिस्थितीत शेतकर्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे हे राजकीय भोंगे बंद करा, अन्यथा 2 मे नंतरत मुंबईत शेतकर्यांचे आक्रोश भोंंगे ऐकण्यास तयार राहा, असा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी दिला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सत्ताधारी व विरोध पक्ष एकमेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करुन भांडत आहेत. त्यामुळे राज्यात पॉलिटीकल गँगवार चालू आहे असे वाटते. पुन्हा सत्तेत येण्यासाठी विरोधी पक्ष बेचैन आहे. राज्याचे सर्वच मंत्री अभि नही... तो कभी नही... हे धोरण अवलंबुन आपआपले पोट भरण्यात मग्न आहेत. छोट्या पक्षाचे वाचाळ नेते जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे स्वतःच्या प्रक्षोभक भाषणाचे भोंगे स्वतःच वाजवत आहेत. व दुस-यांचे भोंगे खाली उतरवा असे म्हणत आहेत व त्याला उत्तर देण्यासाठी इतर पक्षाचे नेते चोवीस तास स्वतःचे भोंगे वाजवत आहेत. यामुळे शेतक-यांच्या प्रश्नांकडे कोणाचेचे लक्ष नाही.
शेतकर्यांच्या मागण्यांसह 1 मे पर्यंत शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे राजकीय नेत्यांचे भोंगे बंद नाही झाले तर मुंबई येथे 2 मे रोजी मंत्रालयासमोर तसेच राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या घरासमोर शेतकरी आक्रोश भोंगे वाजवणार तसेच जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणा-या नेत्यांना सर्व नद्यांचे पाणी व सर्व जामी धर्माच्या शेतक-यांनी काळ्या मातीत पिकवलेले धान्य देणार असे ही विनायक पाटील यांनी सांगीतले.
राज्यातला शेतकरी त्यांच्या विविध समस्यांनी त्रस्त असताना सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी व विरोधक एकमेकाला सामील आहेत. कोणी मशिदीवरील भोंगे बंद करतोय, कोणी हनुमान चालीसा म्हणतोय मात्र इकडे बळीराजा अन्नधान्य, भाजीपाला पिकवणारा शेतकरी उपाशी झोपतोय. याची काळजी कोणालाच नाही म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी 2 मे रोजी महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर शेतकऱ्यांच्या व्यथांची आरती करणार असल्याचे यावेळी पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment